सोमवार, ७ मे, २०१८

शब्दांच्या शोधात


मी कर्तव्याच्या रंगभुमीवर पुन्हापुन्हा घडत
नात्यांच्या वलयात कधी मझ्यातच गुंतत
लिहिते..पाउलखुणाचा मागोवा घेत... आताशा
वाटतं लिहुन काढावं कोणालाच न जमणारं
पण शब्द भरल्या घागरीतुनच ओघळतात
हात सुरकुतलेत गर्भरेशमी शेला विणुन आणि
मृगजळाची मेंदी काढुन
वाटतं लिहून काढावं भेदक-हादरवणारं
पण तुळशीपुढच्या रांगोळीतुन शब्द लगाबगीने येतात
माझ्या ओंजळभर तळ्यात संसाराच तेच ते चित्र
वेगवेगळे रंग भरले तरी प्रतिबिंब तेच
खुपदा शोधते चौकटीबाहेरचा शब्द
वाटतं लिहाव ओतप्रोत धगधगणारं, पण
जान्हवीच्या कुशीतुन शब्द धावत पळत येतात
मी..आकाशवेडी..ओसरीवर बसुन वाट पहाते..धुमकेतूची
तो आदळतो..फाटकापाशी...ना आत ना बाहेर
मी पोह्चेपर्यन्त शब्द मातीत विरुन  जातात
वाटतं लिहून काढावं आक्रीत आणि उत्कलीत
पण उबंरठ्यावरचे शब्द धापा टाकत येतात
उपटून काढायची आहे मला यात रुतलेली माझी बाराखडी
लिहायच आहे उल्लाट आणि आकीर्ण
पण हे काय अंगण सोडतांना शब्द जड झालेत
वारंवार वळून बघत आहेत स्मृतीचित्रांकडे
वास्तवाकडे झेप घेतांना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा