मंगळवार, २ जुलै, २०१९

मनाचिये गुंती........ (भाग-१)


दुपारी वेळ मिळाला आणि पुन्हा एकदा ग्रेसच ’संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" वाचायला घेतलं. कळत होतं....नव्हतं कळत. नक्की सांगता येत नाही. या पुस्तकाच्या निमित्ताने मी माझ्या विश्वातील निर्मितीप्रक्रिया-अनुभवप्रक्रिया-जीवनप्रक्रिया उगाचच तपासू लागले. ग्रेसच्या विश्वाइतकं माझं विश्व व्यापक नाही. त्याची व्याप्ती सिमीत आहे आणि मी त्याचा परिघही सिमीत ठेवला आहे. त्यामुळे माझी ही माझ्या विश्वापूर्ती सिमीत निर्मितीप्रक्रिया सर्वांपुढे मांडते आहे.  

माझी आसक्ती माझ्या विश्वावर. माझं विश्व म्हणजे माझं कुटुंब. जे झालं मग ते हवहवसं असो वा नकोनकोसं ते विसारयचा प्रयत्न माझ्यासाठी एक विरक्ती आहे.
गंगा आणि अलकनंदा माझ्या दोन डोळ्यातून वहातात....तेच कधी घरात प्रलयाचं कारण ठरतात कधी युद्धविरामाचं.  

रोजसारखं घरातलं आवरुन मी फिरायला निघाले. माझं संध्याकाळच पायी फिरणं म्हणजे मनाशी संवाद साधायला काढलेला वेळ. बाकी फिटनेस वैगरे वेळमारुन नेण्याची कारणं. आज फाटकाची कडी उघडतांनाच ग्रेसच्या पुस्तकातील प्रस्तराखालचं स्वगत आठवलं. माझ्या हृदयातला एकांताचा कोपरा मी नक्की कोणासाठी जपून ठेवला होता? एका संध्यामग्न पुरुषासाठी? मी आणि माझं मन दोघंही त्या संध्यामग्न पुरुषाला गाठायला झपाट्याने क्षितीजाच्या दिशेने निघालो. थोड्यावेळ्याने लक्षात आलं त्याच्या शोधात मी बरेच दूरवर निघून आले होते. मग काय, निघाले परतीच्या वाटेवर. मंद होत असलेल्या संधीप्रकाशात दिवसभरातील घटनांचा क्रम  एखाद्दा चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर फिरत होता.
"पहाटे साडेपाचवाजल्यापासून रहाट्गाड्याला स्व:ताला जुंपायचं...चहा नाश्ता, डबे, आजारपण, जेवणं .....आवराआटप....कधी नातेवाईक तर मित्रपरिवार आईबाबांना भेटायला येणारे...कधी मुलामुलीचे मित्र- मैत्रीणी, त्यांचा धुडघुस...परत त्यांच खाणं-पिणं.....आवराआवर.. दुसर्‍या दिवशीच्या शिकवणीची तयारी, कधी पेपर तपासणे, फिरुन आल्यावर रात्रीचा स्वयंपाक...जेवणं....
चारचौघांसारखच माझं कौटुंबिक आयुष्य...नातेवाईक, मित्र-मैत्रीणी.. भिशी.. लग्न..समारंभ..सहली... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माझी दिनचर्या प्रसंगानुरुप बदलत होती. मी ही बदलत होते. हे सगळं व्यवस्थित सुरु असतांना का कोण जाणे  माझ्या निरंतर बदलत जाणार्‍या या भुमिकेतून, अनाहूत म्हणायचं की अनामिक, मलाच कळत नव्हतं, मात्र माझं अस्तित्व नी नव्याने शोधायला लागले होते.  
        माझ्याच मी आनंदाने स्वीकरलील्या आयुष्याचा आढावा घेत असतांना......मी काय होते, मला काय करायचं होते?, मी काय करत आहे? अचानकच हे प्रश्न मला त्रास देऊ लागलेत. इतरांना हे प्रश्न पडत असतील का? असेही विचार मनात यायचे. आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. मला जाणवलं ग्रेससारखा मीही माझ्या संसारात एक जोडबिंदू शोधतेय. जसा दु:खाचा महाकवी दु:ख टाळू शकत नाही, मीही माझ्या संसारात माझं मन मोडणारे प्रसंग टाळू शकत नव्हते.    
खूप करिअर माईंडेड नसले तरी आपल्या आवडत्या विषयात मला काम करायचं होतं. एका शाळेतील शिक्षिकेची नोकरी आई-बाबांच्या आजारपणामुळे सोडावी लागली. 
शिकवण्याची माझी तळमळ स्वस्थ बसू देईना म्हणुन एका प्रायवेट कोचिंग सेंटर जॉईन केले. माझ्यामुळे या शिकवणीमुळे घरी कोणाला गैरसोय नको म्हणून त्या 
दोन तासासाठी आईबाबांसाठी एक केयरटेकरची व्यवस्था केली. आयुष्यात अनेक चांगले-वाईट प्रसंग आलेत, प्रत्येक वेळेस खंबीर होते. प्रत्येक वादळ झेलत माझ्या पाखरांना जपत होते.  जी तडजोड केली ती आनंदानं मग वारंवार संचिताचा शोक मी का करत बसते?  अचानक पडलेल्या या प्रश्नांमुळे मी मात्र भांबावले होते. 
      मनातील कोलाहल दिवसेंदिवस वाढतच होता. "माझं..मी...मला" या त्रिकोणात मी बंदिस्त होत होते. ग्रेस आणि त्यांची कविता याचा उलगडा होणे जेवढे कठीण तेवढाच कठीण मला माझ्या मी पणाचा प्रश्न सध्या भासत होता. जेव्हा वाटतं की ग्रेसचं लेखन  कळायला लागलं.......त्या क्षणी ते परत नव्याने उलगडत जातात, अगदी तसेच माझ्या या मीपणाच्या त्रिकोनाचे झाले होते. 
आशा वेळेस हमखास पडणारा प्रश्न म्हणजे "सुख म्हणजे नक्की काय असतं?" वेळात वेळ काढून परत "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" वाचायला घेतलं. एकटेपणाच्या प्रेमात असलेल्या ग्रेसने मला ही थोडं काळ का होईना एकटं मनसोक्त जगण्याची मजा बहाल केली होती. या मोजक्या क्षणातच मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची होती. 
कुटुंबाला माझ्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आता हळुहळु थकत होता. त्यांच्या अपेक्षा वाढत होत्या आणि त्या पूर्ण करता करता माझी सहनसिद्धी संपत आली होती. आयुष्याच्या अशा वळणावर ऊभी होते जिथे "मला-माझा-मी" या त्रिकोणातून सुटका करुन परत  आयुष्याच्या खळखळणार्‍या प्रवाहात आधीसारखं वाहावत जायचं होतं. पण कसं? सर्व काही उमगत होतं, समजत होतं, असं असूनही या त्रिकोणात अडकले असतांना नकारात्मक विचाराने मला वेढलच. या नकारात्मक भुमिकेतून सकारात्मक उर्जा मिळवण्याची माझी मीच धडापड सुरु केली. ना भजनात मन रमले, ना देव देव करण्यात, ना किटी पार्टीत ना योगासनाच्या वर्गात. एक दिवस मी ग्रेस वाचत असतांना अंतर्मुख झाले होते.

 नेहमीप्रमाणे फिरुन घराकडे परत येतांना कोपर्‍यावरच्या भाजीवाल्याकडॆ भाजी घेतांना लक्षात आलं, त्याचा मुलगा भाजीच्या रिकाम्या बास्केटला उताणे करुन त्यावर अभ्यास करत होता.
"का रे, नाव काय तुझं" मी भाजी निवडत विचारलं
"गोपी" त्याने उत्तर दिलं
"कुठल्या वर्गात?" मी उत्सुकतेनं विचारलं
"आठवीला" गोपी
"ताई, हुशार आहे पोरं. त्याची आई दवाखान्यात काम करते. मी दिवसभर हा भाजीचा धंदा करतो. संध्याकाळी उगाच उनाडत बसतो. म्हणून माझ्यासोबत घेऊन इथे अभ्यासाला बसवतो." भाजीवाला
त्याची वही बघितली. अक्षर मोत्याचे दाणे होते. मनात विचार आला. मी संध्याकाळी तासभर जरी शिकवलं तर? घाईघाईत निर्णय नको घ्यायला. त्याला शाब्बासकी देत घरी आले. जेवतांना मुलांशी यावर चर्चा केली. 
"आई, सुपर्ब आयडिया. मी त्याला इंग्रजी शिकवेन" शर्वरी, माझी मुलगी उत्साहाने म्हणाली.
"खरच आई, मला शनिवार-रविवार त्याचे इतर विषय घेता येईल" शुभम, माझा मुलगा उत्साहाने म्हणाला

हे ऐकून "मी-माझा-मला" हा त्रिकोण भंगला होता. एक नवे चैतन्याने माझे अंग शहारले. ग्रेस यू आर रिअली ग्रेट. मी माझ्या कुटुबांसाठी जी धडपड समजत होती, तो म्हणजे माझ्या सुखाचा सागर असून मी त्याच्या तळाशी पोहचले होते. तुम्ही जसे शब्दांच्या माध्यमातून संवेदनाच्या तळ्यात आकंठ बुडाले असतात ना अगदी तीच प्रचिती मला त्या क्षणी येत होती. ग्रेस, तुम्ही जसे मनसोक्त जगण्यातले प्रत्येक क्षण, त्या क्षणांचे कुतुहल व्यक्त करता ना, तेच कुतुहल, तेच कौतुक मला माझ्या मुलांच्या संवादातून प्रचितीस येत होते.

आत्ताच कोडं सुटलं होतं. दुसर्‍या दिवशी भाजीवाल्याला जाऊन भेटले. 
"रोज संध्याकाळी पाठवत जा त्याला माझ्याकडे अभ्यासाला. आजपासूनच सुरु करु." म्हणताच त्याला आनंद झाला.
आता माझ्याकडे असे बारा मुलं शिकायला येत होती. आज शनिवार, शुभम इतिहास शिकवत होता. 

ग्रेस, तुम्ही कधी रडवलं, कधी हसवलं, कधी अंतर्मुख केलं. स्वत:च्या जगण्यावर मला प्रेम करायला तर तुम्ही शिकवलं. आणि हो, आपल्याला  नक्की काय हवं हे आपणच शोधायचं हे सांगितलं. माझ्या मनात घोळत असलेल्या असंख्य प्रश्नांपैकी काही प्रश्नांना सध्यातरी पुर्णविराम लागला होता.
"आलेच रे फिरुन." मी दार हलकेच ओढत म्हटंलं. 
मी निघाले तर तो संध्यामग्न पुरुष मला फाटकापाशीच दिसला.       

क्रमश:..........
विनीता श्रीकांत देशपांडे