बुधवार, १४ जानेवारी, २०१५

दोनुली

    सोबत  
         (१)
आपल्या आयुष्याचा प्रवास...आपण दोघं..
आपली वाट एक.. आपण एक.......आणि
एका वळणावर मी क्षणभर थांबले, अन
तू मात्र पुढे पुढे चालत राहिलास
एकदा मागे वळून बघायचं तरी रे
माझ्या पायात काटा रुतला होता
मी आवाज दिला...तर म्हणालास
ये मागे मागे....माझ्या पावलांचा मागोवा घेत.
निदान डोळ्यातलं पाणी तरी टिपायचं रे
मी हात मागितला...तर म्हणालास
मी आता खूप घाईत आहे...उठ ये लगबग.
कशाला थांबलीस? विचारयचं तरी रे
माझ्या सावलीचा अंदाज घेत तू चालतच राहिला
आयुष्याच्या वाटेवर. 
          (२)
खर तर एकाच वाटेवरचे आपण प्रवासी
एकमेकांसोबत निघालो...आणि केव्हा
मागेपुढे झालो कळलेच नाही रे.
प्रत्येक वळणावर...मी आहे का नाही
खात्री करुन...वळत गेलास.
मी पण निशब्द...तू जिथे ज्या मार्गाने
न्यायचा..तसे तुझ्या मागून येत गेले.
एका वळणावर मी थोडेच...अगदी कणभर
पुढे गेले...तर केवढा राग आला तुला.
अरे...त्या वाटेवर खूप काटे होते रे
ते तुला बोचले असते म्हणून  उचलायला
मी पुढे सरसावले.
एकदा विचारुन बघितलं असतं तर?

निदान माझ्या डोळ्यात तरी बघायचं..

दोनुली

तरंग
       (१)
मनात उठणारे विचारांचे तरंग
या तरंगांवर हेलकावणारी
कधी आशा, कधी निराशा,
आशेचा तरंग पक्षी होतो, उडून जातो
निराशेचे उसासे परत फिरुन
उसळत रहातात.
हे तरंग क्षणभर विसावा घेत नाहीत
सतत उठणार आणि उसळणार.
केव्हापासून शोधते आहे...आकशात एखादा पक्षी
ओंजळीत उसासे घेऊन.
       (२) 
अंतर्मनात सतत उठणार्‍या
असंख्य विचार तरंगाना
माझ्या मेंदूने परत थोपवले
खर तर या मुजोर विचारांचे
मनात वादळ माजले आहे
पण मेंदूनी बांधलेला बांध
भक्कम आहे.
सुनामी आलच तर आता
स्वदेह पाय रोवून उभा आहे
निश्चयाच्या महामेरुवर.

दोनुली,

प्रश्न
         (१)
प्रश्नच प्रश्न, कधी डोंगरा सारखे
कधी झाडा एवढे
प्रश्नांचा गुंता सुटता सुटत नाही
उगवत्या सूर्या सोबत रोज येतात
पण तो मावळतांना प्रश्न अस्त होतच नाही
आणि मग दिवसेनदिवस वाढत रहातात
सोडवायचे कसे ? हा प्रश्न विचारत.
         (२)
मी आज सूर्योदयाची वाटच पहात होते
उत्तरांची झोळी घेउन.
पण हे काय मला सतत सतावणारे प्रश्न
आहेत कुठे ?
रोज माझी वाट अडवतात
आज मी वाट बघत आहे तर दडून बसलेत
असो, या सोप्प्या प्रश्नांसाठी मी माझी

झोळी कशाला रिकामी करु ?

दोनुली

 पायवाट
         (१)
मातीत मळलेली पायवाट
माझ्या पाउलांखालुन हळुहळु सरकत होती
निर्मनुष्य...थोडीशी अवघडलेली.
मी येणार म्हणुन...की काय
पानांची सळसळ थांबली होती
वारा पण दुसर्‍या वाटेन निघून गेला
उशिरा का होईना..उमगले
ही वाट तर माझ्या तळहातांच्या
रेषेवरुनच जात होती.
      (२)
पाउलखुणांचा मागोवा घेत
निघुन तर आले या पायवाटेवर
माणसांनी गजबजलेल्या या वाटेवर
कोणाला वेळच नाही..क्षणभर
सगळेच चेहरे विझलेले...मग्न..हरवलेले
या वाटेवरचे चैतन्य माझ्या कडे धावत धावत आले
"चल तुझे लक्ष्य वाट बघत आहे..गाठ घालून देतो ".


दोनुली

                               दोनुली
( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं. मी एक रचना लिहिली आणि त्या विषयाबद्दल मनात-विचारांत उठणारे आंदोलन कुठेतरी माझ्यातच घुटमळत राहिले.
खरतर त्यावर दुसरी रचना लिहिता आली असती पण ती आंदोलने त्याच विषयात गुरफटलेले होते. अशातच कान्तांचा दोनुली संग्रह वाचण्यात आला. आणि माझ्या रचनेतील  अव्यक्त दोनुली व्यक्त झाली.)       

    नदीचा काठ
        (१)
किरणांनी मोहरलेले नदीतले पाणी
हसत खिदळत काठावर आले
काठ मोहरला...हिरवागार झाला
हळुहळु सारा परिसर कंच हिरवा झाला.
काही दिवसांनी तीच पाण्याची लाट परत आली
"अरे काय सुरेख काठ आहे..थांबु या का थोडे?"
पाणी थांबले आणि..आता या शेवाळ्लेल्या काठवर
हल्ली कोणी येतच नाही.

        (२)
ओढ्याचा बांध तोडून पाणी खळखळून
वाहत होते..अखंड आणि अविरत
झाडाझुडपातून..दर्या खोर्‍यातून
कपारीतून...भानच नव्हते त्याला
घनदाट जंगलातून...वाट तुडवत होते
कधी नीळे.कधी हिरवे....कधी गढुळ होत..
त्यालाच ठाउक नव्हती..त्याची वाट
पाण्याच्या प्रवाहाला एकच ध्यास..एकच ओढ...
सागरभेटीची.


शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

उगी ग उगी...


उगी ग उगी...
डोळ्यातलं पाणी पाहून
ओठावरलं हसू म्हणाले...
उगी ग उगी,
इतक्यात हळवी नको होऊस
आयुष्याचा बराच प्रवास बाकी आहे
थोडं पाणी ठेव जपून.
काळजाचा ठोका चुकलेला पाहून
स्पंदनं हळूच म्हणाले...
उगी ग उगी,
इतकी घाई बरी नाही
आयुष्याचा बराच प्रवास बाकी आहे
सहनसिद्धी ठेव जपून.

आठवणी -गावाकडच्या


आठवणी -गावाकडच्या
जात्यावरती अजून आजी
गुणगुणते का ग ओवी ?
अंगणामागच्या गोठ्यामधे
हंबरतात का  गाई ?
परसदारी तुळशीपाशी
तेवतो आहे का ग दिवा ?
आंब्याच्या फांदीवर अजून
झुलतो का  हिंदोळा ?
पडवीमधल्या टोपलीखाली
उरली आहेत का ग बोरं?
उंबराच्या पाराभोवती
खेळतात का  पोरं ?
गावाकडची पायवाट माझ्या
पायाखालुन सरकत आहे
ओटीवरती वाळवण तसेच
अजून का ग सुकते आहे?
ओटीवरती वाळवण तसेच
अजून का ग सुकते आहे?