रविवार, ७ जुलै, २०१९

मनाचिये गुंती........(भाग २)




मनाचिये गुंती........(भाग २)


रोजचं सरळसोट जगणं, तेच तेच रहाटगाडं.  किती प्रश्न पडावे... किती उत्तरे मिळावित..किती अनुत्तरीत रहावी. नाही का? रोजची धावपळ या प्रश्नांच्या उत्तरांसाठीच. आयुष्यात प्रश्नोत्तराचा हा खेळ न संपणारा आहे. या खेळात काही क्षणाची विश्रांती प्रत्येकजण शोधत असतो. माझ्यासाठी विश्रांतीचे हे क्षण म्हणजे संध्याकाळच्या आकाशाकडे टक लावून बघणं. माझ्या छोट्याशा बालकनीतून संध्याकाळच ं आकाश बघतांना नकळत माझं आकाश विस्तृत आणि व्यापक होत जातं. कोणास ठाऊक त्या क्षणी मनात-डोक्यात घोळत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळो अथवा नाही, मन मात्र समाधानाने तुडुंब भरुन जातं. 

आज विखुरलेल्या सावळ्या ढगात अधे मधे केशरी छ्टा डोकवत होत्या. एक क्षण वाटलं, दिवसभर थकल्या भागल्या प्रकाशाची निमिषाच्या बाहूपाशात विश्रांती घेण्यासाठी ही वेडी धडपड तर नाही ना. ही निव्वळ भौगोलिक घटना आहे हे बुद्धीला ठाऊक का नव्हतं? होतं ना,  मन ... ते तर रेंगाळत होतं....त्या लपाछपीच्या डावात. संध्येचा साज हळु हळु सरत होता. माझी पावलं दारात घुटमळलीत. सवयी प्रमाणे  मागे वळून बघितलं. शामप्रहरी दूरवर एक चांदणी जणु आळस झटकत जागी  होत होती. हे बघताच शांता शेळकेची रचना आठवली.

"तुझा" आणि "तुझ्यासाठी"
शब्द सारे खोटे
खरी फक्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगुन सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?

खरंच, आयुष्यात स्वत:शिवाय आपण सर्वस्वी कोणालाच कळत नसतो. आपण एकमेकांना फक्त ओळखत असतो. प्रत्येकाला आपलं.......आपलेपणा न कळु देण्याची तर सारी धडपड असते. तो काय म्हणेल?......ते काय म्हणतील?.....सगळे काय म्हणतील?......त्यांना काय वाटेल?.....ते काय समजतील?.....हे टाळण्यासाठी जो-तो आपल्या त्वचेखाली आपापलं एकाकीपण कायम जपत असतो. हो, जपायलाच पाहिजे. सर्वांना मी काय आहे? मी कोण आहे?  हे जाणण्याचा जरी उत्सुकता असली, हक्क असला....तरी मला ते नको आहे ना. आपण स्वत:शी प्रामाणिक असणे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. स्वत:चं स्वत:शी जुळवून घेणं ही सोप्प नाही. अनुकुल असो वा प्रतिकुल कुठल्याही परिस्थितीत स्वत:शीच कधीकधी तडजोड करावी लागते, म्हणून तर या.....मन मारुन....मनाला मुरड घालुन....मनाविरुद्ध, या संकल्पनांच अस्तित्व आहे. एकांतात या मनाविरुद्ध कराव्या लागणार्‍या गोष्टी बोचतात. नेमका याच आपल्याला बोचणार्‍या विषयाला धरुन एखादी कविता वा कथा मनाला भावते....किंवा एखादा सिनेमा...नाटक आवडून जातं. या भावनांचा निचरा करणार्‍या प्रक्रियेला ॲरिस्टॉटल कॅथॉरसिस अर्थात विरेचन म्हणतो.
विरेचन......याची गरज प्रत्येकाला असते. भावनांचं विरेचन झाल्यावरच माझ्यातलं मी पण परत नव्याने गवसतं....स्वत:बद्दल नवे जाणून घेण्याचा हा प्रवास ही खरच छान असतो. या विरेचनामुळे आपल्याच नव्या क्षमता आपल्याला गवसतात.

क्रमश:

विनीता श्रीकांत देशपांडे

मंगळवार, २ जुलै, २०१९

मनाचिये गुंती........ (भाग-१)


दुपारी वेळ मिळाला आणि पुन्हा एकदा ग्रेसच ’संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" वाचायला घेतलं. कळत होतं....नव्हतं कळत. नक्की सांगता येत नाही. या पुस्तकाच्या निमित्ताने मी माझ्या विश्वातील निर्मितीप्रक्रिया-अनुभवप्रक्रिया-जीवनप्रक्रिया उगाचच तपासू लागले. ग्रेसच्या विश्वाइतकं माझं विश्व व्यापक नाही. त्याची व्याप्ती सिमीत आहे आणि मी त्याचा परिघही सिमीत ठेवला आहे. त्यामुळे माझी ही माझ्या विश्वापूर्ती सिमीत निर्मितीप्रक्रिया सर्वांपुढे मांडते आहे.  

माझी आसक्ती माझ्या विश्वावर. माझं विश्व म्हणजे माझं कुटुंब. जे झालं मग ते हवहवसं असो वा नकोनकोसं ते विसारयचा प्रयत्न माझ्यासाठी एक विरक्ती आहे.
गंगा आणि अलकनंदा माझ्या दोन डोळ्यातून वहातात....तेच कधी घरात प्रलयाचं कारण ठरतात कधी युद्धविरामाचं.  

रोजसारखं घरातलं आवरुन मी फिरायला निघाले. माझं संध्याकाळच पायी फिरणं म्हणजे मनाशी संवाद साधायला काढलेला वेळ. बाकी फिटनेस वैगरे वेळमारुन नेण्याची कारणं. आज फाटकाची कडी उघडतांनाच ग्रेसच्या पुस्तकातील प्रस्तराखालचं स्वगत आठवलं. माझ्या हृदयातला एकांताचा कोपरा मी नक्की कोणासाठी जपून ठेवला होता? एका संध्यामग्न पुरुषासाठी? मी आणि माझं मन दोघंही त्या संध्यामग्न पुरुषाला गाठायला झपाट्याने क्षितीजाच्या दिशेने निघालो. थोड्यावेळ्याने लक्षात आलं त्याच्या शोधात मी बरेच दूरवर निघून आले होते. मग काय, निघाले परतीच्या वाटेवर. मंद होत असलेल्या संधीप्रकाशात दिवसभरातील घटनांचा क्रम  एखाद्दा चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर फिरत होता.
"पहाटे साडेपाचवाजल्यापासून रहाट्गाड्याला स्व:ताला जुंपायचं...चहा नाश्ता, डबे, आजारपण, जेवणं .....आवराआटप....कधी नातेवाईक तर मित्रपरिवार आईबाबांना भेटायला येणारे...कधी मुलामुलीचे मित्र- मैत्रीणी, त्यांचा धुडघुस...परत त्यांच खाणं-पिणं.....आवराआवर.. दुसर्‍या दिवशीच्या शिकवणीची तयारी, कधी पेपर तपासणे, फिरुन आल्यावर रात्रीचा स्वयंपाक...जेवणं....
चारचौघांसारखच माझं कौटुंबिक आयुष्य...नातेवाईक, मित्र-मैत्रीणी.. भिशी.. लग्न..समारंभ..सहली... आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माझी दिनचर्या प्रसंगानुरुप बदलत होती. मी ही बदलत होते. हे सगळं व्यवस्थित सुरु असतांना का कोण जाणे  माझ्या निरंतर बदलत जाणार्‍या या भुमिकेतून, अनाहूत म्हणायचं की अनामिक, मलाच कळत नव्हतं, मात्र माझं अस्तित्व नी नव्याने शोधायला लागले होते.  
        माझ्याच मी आनंदाने स्वीकरलील्या आयुष्याचा आढावा घेत असतांना......मी काय होते, मला काय करायचं होते?, मी काय करत आहे? अचानकच हे प्रश्न मला त्रास देऊ लागलेत. इतरांना हे प्रश्न पडत असतील का? असेही विचार मनात यायचे. आधी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. मला जाणवलं ग्रेससारखा मीही माझ्या संसारात एक जोडबिंदू शोधतेय. जसा दु:खाचा महाकवी दु:ख टाळू शकत नाही, मीही माझ्या संसारात माझं मन मोडणारे प्रसंग टाळू शकत नव्हते.    
खूप करिअर माईंडेड नसले तरी आपल्या आवडत्या विषयात मला काम करायचं होतं. एका शाळेतील शिक्षिकेची नोकरी आई-बाबांच्या आजारपणामुळे सोडावी लागली. 
शिकवण्याची माझी तळमळ स्वस्थ बसू देईना म्हणुन एका प्रायवेट कोचिंग सेंटर जॉईन केले. माझ्यामुळे या शिकवणीमुळे घरी कोणाला गैरसोय नको म्हणून त्या 
दोन तासासाठी आईबाबांसाठी एक केयरटेकरची व्यवस्था केली. आयुष्यात अनेक चांगले-वाईट प्रसंग आलेत, प्रत्येक वेळेस खंबीर होते. प्रत्येक वादळ झेलत माझ्या पाखरांना जपत होते.  जी तडजोड केली ती आनंदानं मग वारंवार संचिताचा शोक मी का करत बसते?  अचानक पडलेल्या या प्रश्नांमुळे मी मात्र भांबावले होते. 
      मनातील कोलाहल दिवसेंदिवस वाढतच होता. "माझं..मी...मला" या त्रिकोणात मी बंदिस्त होत होते. ग्रेस आणि त्यांची कविता याचा उलगडा होणे जेवढे कठीण तेवढाच कठीण मला माझ्या मी पणाचा प्रश्न सध्या भासत होता. जेव्हा वाटतं की ग्रेसचं लेखन  कळायला लागलं.......त्या क्षणी ते परत नव्याने उलगडत जातात, अगदी तसेच माझ्या या मीपणाच्या त्रिकोनाचे झाले होते. 
आशा वेळेस हमखास पडणारा प्रश्न म्हणजे "सुख म्हणजे नक्की काय असतं?" वेळात वेळ काढून परत "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" वाचायला घेतलं. एकटेपणाच्या प्रेमात असलेल्या ग्रेसने मला ही थोडं काळ का होईना एकटं मनसोक्त जगण्याची मजा बहाल केली होती. या मोजक्या क्षणातच मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधायची होती. 
कुटुंबाला माझ्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आता हळुहळु थकत होता. त्यांच्या अपेक्षा वाढत होत्या आणि त्या पूर्ण करता करता माझी सहनसिद्धी संपत आली होती. आयुष्याच्या अशा वळणावर ऊभी होते जिथे "मला-माझा-मी" या त्रिकोणातून सुटका करुन परत  आयुष्याच्या खळखळणार्‍या प्रवाहात आधीसारखं वाहावत जायचं होतं. पण कसं? सर्व काही उमगत होतं, समजत होतं, असं असूनही या त्रिकोणात अडकले असतांना नकारात्मक विचाराने मला वेढलच. या नकारात्मक भुमिकेतून सकारात्मक उर्जा मिळवण्याची माझी मीच धडापड सुरु केली. ना भजनात मन रमले, ना देव देव करण्यात, ना किटी पार्टीत ना योगासनाच्या वर्गात. एक दिवस मी ग्रेस वाचत असतांना अंतर्मुख झाले होते.

 नेहमीप्रमाणे फिरुन घराकडे परत येतांना कोपर्‍यावरच्या भाजीवाल्याकडॆ भाजी घेतांना लक्षात आलं, त्याचा मुलगा भाजीच्या रिकाम्या बास्केटला उताणे करुन त्यावर अभ्यास करत होता.
"का रे, नाव काय तुझं" मी भाजी निवडत विचारलं
"गोपी" त्याने उत्तर दिलं
"कुठल्या वर्गात?" मी उत्सुकतेनं विचारलं
"आठवीला" गोपी
"ताई, हुशार आहे पोरं. त्याची आई दवाखान्यात काम करते. मी दिवसभर हा भाजीचा धंदा करतो. संध्याकाळी उगाच उनाडत बसतो. म्हणून माझ्यासोबत घेऊन इथे अभ्यासाला बसवतो." भाजीवाला
त्याची वही बघितली. अक्षर मोत्याचे दाणे होते. मनात विचार आला. मी संध्याकाळी तासभर जरी शिकवलं तर? घाईघाईत निर्णय नको घ्यायला. त्याला शाब्बासकी देत घरी आले. जेवतांना मुलांशी यावर चर्चा केली. 
"आई, सुपर्ब आयडिया. मी त्याला इंग्रजी शिकवेन" शर्वरी, माझी मुलगी उत्साहाने म्हणाली.
"खरच आई, मला शनिवार-रविवार त्याचे इतर विषय घेता येईल" शुभम, माझा मुलगा उत्साहाने म्हणाला

हे ऐकून "मी-माझा-मला" हा त्रिकोण भंगला होता. एक नवे चैतन्याने माझे अंग शहारले. ग्रेस यू आर रिअली ग्रेट. मी माझ्या कुटुबांसाठी जी धडपड समजत होती, तो म्हणजे माझ्या सुखाचा सागर असून मी त्याच्या तळाशी पोहचले होते. तुम्ही जसे शब्दांच्या माध्यमातून संवेदनाच्या तळ्यात आकंठ बुडाले असतात ना अगदी तीच प्रचिती मला त्या क्षणी येत होती. ग्रेस, तुम्ही जसे मनसोक्त जगण्यातले प्रत्येक क्षण, त्या क्षणांचे कुतुहल व्यक्त करता ना, तेच कुतुहल, तेच कौतुक मला माझ्या मुलांच्या संवादातून प्रचितीस येत होते.

आत्ताच कोडं सुटलं होतं. दुसर्‍या दिवशी भाजीवाल्याला जाऊन भेटले. 
"रोज संध्याकाळी पाठवत जा त्याला माझ्याकडे अभ्यासाला. आजपासूनच सुरु करु." म्हणताच त्याला आनंद झाला.
आता माझ्याकडे असे बारा मुलं शिकायला येत होती. आज शनिवार, शुभम इतिहास शिकवत होता. 

ग्रेस, तुम्ही कधी रडवलं, कधी हसवलं, कधी अंतर्मुख केलं. स्वत:च्या जगण्यावर मला प्रेम करायला तर तुम्ही शिकवलं. आणि हो, आपल्याला  नक्की काय हवं हे आपणच शोधायचं हे सांगितलं. माझ्या मनात घोळत असलेल्या असंख्य प्रश्नांपैकी काही प्रश्नांना सध्यातरी पुर्णविराम लागला होता.
"आलेच रे फिरुन." मी दार हलकेच ओढत म्हटंलं. 
मी निघाले तर तो संध्यामग्न पुरुष मला फाटकापाशीच दिसला.       

क्रमश:..........
विनीता श्रीकांत देशपांडे

बुधवार, ९ मे, २०१८

A Psalm of Life /जीवन स्तोत्र


A Psalm of Life



Tell me not in mournful numbers,
Life is but an empty dream!
For the soul is dead that slumbers,
And things are not what they seem.

Life is real! Life is earnest!
And the grave is not its goal;
Dust thou are, to dust thou returnest,
Was not spoken of the soul.

Not enjoyment, and not sorrow,
Is our destined end or way;
But to act, that each tomorrow
Find us farther than today.

Art is long, and Time is fleeting,
And our hearts, though stout and brave,
Still, like muffled drums, are beating
Funeral marches to the grave.

In the world's broad field of battle,
In the bivouac of Life,
Be not like dumb, driven cattle!
Be a hero in the strife!

Trust no Future, howe'er pleasant!
Let the dead Past bury its dead!
Act, - act in the living Present!
Heart within, and God o'erhead!

Lives of great men all remind us
We can make our lives sublime,
And, departing, leave behind us
Footprints on the sand of time;

Footprints, that perhaps another,
Sailing o'er life's solenm main,
A forlorn and shipwrecked brother,
Seeing, shall take heart again.

Let us then be up and doing,
With a heart for any fate;
Still achieving, still pursuing,
Learn to labor and to wait.

( Henry wordsworth Longfello)
   
  जीवन स्तोत्र

जीवन म्हणजे एक रिते स्वप्न
या स्वप्नाळू जगात अनेक मग्न
त्यांचा आत्मा निर्जीव-निश्बद
अर्थ जगण्याचा होतो अस्तंगत

जीवन म्हणजे एक आस्था,एक सत्य
मृत्यु नसे जीवनाचे अंतिम लक्ष्य
मातीतुन देह जन्मतो होतो त्यात अस्त
या सत्यापासून आत्मा असतो अलिप्त

जीवन म्णजे ना आनंद - ना दु:
जन्म कधी अंत प्रत्येकाच प्रारब्ध
"उद्या" येणार"आजचा"प्रत्येक क्षण
या क्षणात शोधायच हरवलेलं मी पण

निर्मितीच्या प्रतिक्षेत काळ धावे वेगात
उठतात जरी आवेशाच्या लाटा मनात
अंतयात्रेचे मंत्राक्षर घुटमळती कानात
नश्वर देहाचा अंत अटळ या मातीत

अखिल जगाच्या विस्तृत रणभुमीवर
जीवनाचा असे तात्पुरता तळ
जगणे नको जसे पशू हाकतो मेंढपाळ
जीवनाच्या संघर्षात साहस हवे प्रबळ

जरी रम्य तरी विसंबु नका भविष्यावर
गतजीवनातील स्मॄतींना करुन काळाआड
जगा, जगत रहा वर्तमान काळात
ईशकृपेची उजळत मंद ज्योत ह्रदयात

थोरामोठ्यांचे कतॄत्व सतत आठवत
करावे आपल्या जीवनाचे सार्थक
जाता जाता आपल्या मागे,जीवनात
चालावे निरंतर ,पाउलखुणा सोडत

पाउलखुणा कदाचित असतील भिन्न
जीवनप्रवासाचे ध्यय असावे पावन
या प्रवासात हरवलेले उपेक्षित आप्तेष्ट
आपले जगणे ठरावे त्यांना प्रेरक

चला अविरत असो कसे ही प्राक्तन
कर्म करत दिव्यत्वाकडे होऊ मार्गस्थ
जीवनप्रवासाची ध्येयपूर्ती होईल साध्य
करता प्रतिक्षा अन परिश्रम अगाध.

कविता- ए साम ऑफ लाईफ
कवि- हेनरी वर्ड्स्वर्थ लॉंगफेलो
अनुवाद-विनीता देशपांडे

कधी कधी

कधी कधी कोणाची सोबत ही नकोशी होते
कोणात अडकायच नाही,कोणाला गुंफायच नाही
आपण असच चालत रहावं......एकटं.....
कधी कधी आठवणी ही नकोशा होतात
उगाच उगाळायच्या नाही,उजाळायच्या नाही
आपण असच चालत रहावं....एकटं....
कधी कधी सगळे आवाज नकोसे होतात
तो गोंगाट..ती कलकल... ऐकायची नाही
आपण असच चालत रहावं....एकटं....
निशब्द...निसंग...चालत रहावं..एकटं...
अनाहुतपणे...सोबत असून नसल्यासारख
शब्दांच्यापलीकडच्,आठवणींच्यापलीकडच
अंतर्मन आवाज न करता बोलतं....मग
आपल्याला...ती सोबत..त्या आठवणी....ते आवाज..
सगळच हवहवसं वाटतं..........

सोमवार, ७ मे, २०१८

शब्दांच्या शोधात


मी कर्तव्याच्या रंगभुमीवर पुन्हापुन्हा घडत
नात्यांच्या वलयात कधी मझ्यातच गुंतत
लिहिते..पाउलखुणाचा मागोवा घेत... आताशा
वाटतं लिहुन काढावं कोणालाच न जमणारं
पण शब्द भरल्या घागरीतुनच ओघळतात
हात सुरकुतलेत गर्भरेशमी शेला विणुन आणि
मृगजळाची मेंदी काढुन
वाटतं लिहून काढावं भेदक-हादरवणारं
पण तुळशीपुढच्या रांगोळीतुन शब्द लगाबगीने येतात
माझ्या ओंजळभर तळ्यात संसाराच तेच ते चित्र
वेगवेगळे रंग भरले तरी प्रतिबिंब तेच
खुपदा शोधते चौकटीबाहेरचा शब्द
वाटतं लिहाव ओतप्रोत धगधगणारं, पण
जान्हवीच्या कुशीतुन शब्द धावत पळत येतात
मी..आकाशवेडी..ओसरीवर बसुन वाट पहाते..धुमकेतूची
तो आदळतो..फाटकापाशी...ना आत ना बाहेर
मी पोह्चेपर्यन्त शब्द मातीत विरुन  जातात
वाटतं लिहून काढावं आक्रीत आणि उत्कलीत
पण उबंरठ्यावरचे शब्द धापा टाकत येतात
उपटून काढायची आहे मला यात रुतलेली माझी बाराखडी
लिहायच आहे उल्लाट आणि आकीर्ण
पण हे काय अंगण सोडतांना शब्द जड झालेत
वारंवार वळून बघत आहेत स्मृतीचित्रांकडे
वास्तवाकडे झेप घेतांना

कातरवेळ



           ()
रोज कतरवेळी....क्षितीजाकाठी
असावी फक्त मी.. आणि मी
स्वत;लाच विचारावे...
खरी किती
किती खोटी
आणि मग सगळे खरे-खोटे क्षणांचे थवे
धावत येऊन बिलगतात
त्यांचा खोटा प्रयत्न माझ्यातला
खरेपणा सिध्द करण्याचा
किती फसवा असतो नाही...

           ()
घरी परतणार्‍या पक्षांचे थवे बघितले अन
कातरवेळेची जाणीव झाली
हल्ली मावळतीचा थाट बघतच नाही मी
उगाच मी आणि माझ्यातल्या मीपणाची
क्षितीजाची रेघ स्पष्ट होत जाते.
मी कशीही असली खरी-खोटी तरी
हे सिद्ध करण्या आधीच स्प्ष्ट झालेली
क्षितीजाची रेघ अंधारात विरुन जाते.
आणि म्हणूनच मी  स्वत:ला फसवत
रोज कातरवेळच टाळते.


स्वप्नवेल


केशरी सांज आली उडवित गंध
काजळेल आता आसमंत धुंद
आसुसते आस माझ्या अंतरंगी
तुझ्या आठवांची चढली रे धुंदी
माझ्या मनी उजळले सप्तरंग
काळजात केले तुला नजरबंद
व्याकूळ जीवाला तुझा गंधवेल
उमलला मनी आपला स्वप्नवेल