रविवार, ७ जुलै, २०१९

मनाचिये गुंती........(भाग २)




मनाचिये गुंती........(भाग २)


रोजचं सरळसोट जगणं, तेच तेच रहाटगाडं.  किती प्रश्न पडावे... किती उत्तरे मिळावित..किती अनुत्तरीत रहावी. नाही का? रोजची धावपळ या प्रश्नांच्या उत्तरांसाठीच. आयुष्यात प्रश्नोत्तराचा हा खेळ न संपणारा आहे. या खेळात काही क्षणाची विश्रांती प्रत्येकजण शोधत असतो. माझ्यासाठी विश्रांतीचे हे क्षण म्हणजे संध्याकाळच्या आकाशाकडे टक लावून बघणं. माझ्या छोट्याशा बालकनीतून संध्याकाळच ं आकाश बघतांना नकळत माझं आकाश विस्तृत आणि व्यापक होत जातं. कोणास ठाऊक त्या क्षणी मनात-डोक्यात घोळत असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळो अथवा नाही, मन मात्र समाधानाने तुडुंब भरुन जातं. 

आज विखुरलेल्या सावळ्या ढगात अधे मधे केशरी छ्टा डोकवत होत्या. एक क्षण वाटलं, दिवसभर थकल्या भागल्या प्रकाशाची निमिषाच्या बाहूपाशात विश्रांती घेण्यासाठी ही वेडी धडपड तर नाही ना. ही निव्वळ भौगोलिक घटना आहे हे बुद्धीला ठाऊक का नव्हतं? होतं ना,  मन ... ते तर रेंगाळत होतं....त्या लपाछपीच्या डावात. संध्येचा साज हळु हळु सरत होता. माझी पावलं दारात घुटमळलीत. सवयी प्रमाणे  मागे वळून बघितलं. शामप्रहरी दूरवर एक चांदणी जणु आळस झटकत जागी  होत होती. हे बघताच शांता शेळकेची रचना आठवली.

"तुझा" आणि "तुझ्यासाठी"
शब्द सारे खोटे
खरी फक्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगुन सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?

खरंच, आयुष्यात स्वत:शिवाय आपण सर्वस्वी कोणालाच कळत नसतो. आपण एकमेकांना फक्त ओळखत असतो. प्रत्येकाला आपलं.......आपलेपणा न कळु देण्याची तर सारी धडपड असते. तो काय म्हणेल?......ते काय म्हणतील?.....सगळे काय म्हणतील?......त्यांना काय वाटेल?.....ते काय समजतील?.....हे टाळण्यासाठी जो-तो आपल्या त्वचेखाली आपापलं एकाकीपण कायम जपत असतो. हो, जपायलाच पाहिजे. सर्वांना मी काय आहे? मी कोण आहे?  हे जाणण्याचा जरी उत्सुकता असली, हक्क असला....तरी मला ते नको आहे ना. आपण स्वत:शी प्रामाणिक असणे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. स्वत:चं स्वत:शी जुळवून घेणं ही सोप्प नाही. अनुकुल असो वा प्रतिकुल कुठल्याही परिस्थितीत स्वत:शीच कधीकधी तडजोड करावी लागते, म्हणून तर या.....मन मारुन....मनाला मुरड घालुन....मनाविरुद्ध, या संकल्पनांच अस्तित्व आहे. एकांतात या मनाविरुद्ध कराव्या लागणार्‍या गोष्टी बोचतात. नेमका याच आपल्याला बोचणार्‍या विषयाला धरुन एखादी कविता वा कथा मनाला भावते....किंवा एखादा सिनेमा...नाटक आवडून जातं. या भावनांचा निचरा करणार्‍या प्रक्रियेला ॲरिस्टॉटल कॅथॉरसिस अर्थात विरेचन म्हणतो.
विरेचन......याची गरज प्रत्येकाला असते. भावनांचं विरेचन झाल्यावरच माझ्यातलं मी पण परत नव्याने गवसतं....स्वत:बद्दल नवे जाणून घेण्याचा हा प्रवास ही खरच छान असतो. या विरेचनामुळे आपल्याच नव्या क्षमता आपल्याला गवसतात.

क्रमश:

विनीता श्रीकांत देशपांडे